Tuesday, April 21, 2009

..

सगळं छानच चालू आहे.
अगदी सुरळीत.. बोरिंगली सुरळीत.
म्हणूनच कंटाळवाणं.
’धगधगीत लाल’असं काही कधी घडणार आहे का हातून? स्वत:च्या नाहीतर नाही पण इतर कुणाच्या हातूनही तसलं काही घडताना दिसत नाहीय हे जास्त बोरिंग.

बाकी तसलं काही घडायचं तेव्हां घडो. पण ऐन उन्हाळ्यातल्या धगधगत्या निखा-यासारख्या तापलेल्या औरंगाबादजवळच्या आमच्या प्रोजेक्ट साईटच्या गावात नुकताच घालवलेला आठवडा मात्र अफलातून होता. त्या कहर उन्हामधे फ़िर फ़िर फ़िरुन परतल्यावर आमच्या नाजूक :P तब्येतीची जी काय वाट लागायची ती लागलीच अर्थात पण आता परतल्यावर इथे ऑफ़िसातलं बोरिंग रुटिन सुरु झालं आणि ते तिथल्या फ़ुललेल्या पळसासारखे लालभडक दिवस सारखे आठवायला लागलेत. .

काल अगदी मारे नव्या टेम्प्लेट लावलेल्या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली त्याबद्दल. त्या सगळ्या दिवसांबद्दल लिहिण्यासारखं बरंच आहे पण अर्ध्यावरच बोर झालं. कायतरी करायला हवय या इन्जनरल डोस्क्यात भरलेल्या कंटाळ्याचं.



*धगधगीत लाल हातून घडणं हा खास जीएंचा शब्दप्रयोग. उधार घेतला त्यांच्याकडून. इतकं पर्फ़ेक्ट वर्णन त्यांच्यावाचून दुस-या कुणाला सुचणार म्हणा!

Thursday, February 19, 2009

स्टेशन

रेल्वेचा चांगलाच मोठा प्रवास आहे. मोठा म्हणजे अगदी दोन तिन दिवसांचा. मी तो खूपच एन्जॉय करतेय. बरोबर कोण आहे किंवा मी एकटीच आहे हे फारसं महत्वाचं नसावं. म्हणजे त्यांची सोबत माझ्या डोक्यातच नाहीय. मी आपली हातात एक कोणततरी मोठंथोरलं पुस्तक घेऊन कधी खिडकीत पाय लांब करुन किंवा पोटाशी घेऊन आरामात वाचत बसलेय. खिडक्या आत्ताच्या ट्रेन्ससारख्या काचबंद नाहीत. भणाण वारा आत आणणा-या बिनगजांच्या खिडक्या. मी बराच वेळ हातात चहाचा कप आणि पुस्तक आणि कानात गाणी अशी बसून. धडाधडा आवाज करत ट्रेन एकेक स्टेशन मागे टाकत धावत जातेय.खूप प्रवास अजून बाकी आहे. खिडकीबाहेर पळसाची लालभडक फ़ुललेली झाडं दिसताहेत म्हणजे बहुतेक कोणत्यातरी उन्हाळी सुट्टितला प्रवास आहे हा. कडुनिंबाची गार सावलीची गडद हिरवी झाडंही मधे मधे आहेत.
मग मला कंटाळा येतो. मी पुस्तक मिटवून, जागेवरुन उठते. दरवाजापाशी पोचते. ट्रेन खूपच रिकामी वाटतेय. की सगळीच रिकामी? नसावी कारण हालचाली जाणवताहेत दरवाजापाशी जाताना. मी दरवाजा उघडून बाहेर डोकावते तेव्हां ट्रेन स्लो होतेय. बहुधा कोणतंतरी स्टेशन जवळ येतय.
ट्रेन स्टेशनमधे शिरते तेव्हां ते स्टेशन एकदम देखणंच दिसत मला. काहीतरी वेगळंच, आकर्षून घेणारं आहे त्या लहानशा स्टेशनमधे. एक चहाचा स्टॉल आहे जिथे किटलीत पाणी उकळत आहे, वाफ़ा येत आहेत आणि स्टॉलवर कोणिच नाहीय. पेपरवाले, मासिकांचा आणि पुस्तकांचा ढिगारा लादलेले कार्ट, फ़ळवाले, कुल्हडमधला चहा विकणारे असे कोण कोण स्टेशनवर मधूनच फ़िरताहेत. पिवळ्याधमक केळ्यांच्या घडांनी भरलेली टोपली घेऊन एकजण माझ्या अगदी समोरुन जातो. मी दरवाजावर दोन्ही हात टेकवून उभी आहे. सिग्नल नाही मिळालेला अजून ट्रेनला.
स्टेशनच्या भिंतीबाहेरुन गार हवेच्या झुळका येताहेत. बहुतेक मगाशी खिडकीतून दिसलेली कडुनिंबाची झाडे असावीत एखाद्या पाण्याच्या साठ्याभोवताली. आणि लालजर्द पलाशचे वृक्षही त्या भिंतीबाहेर असणार. अजून काय आहे? कुठे जंगलाच्या दिशेने जातोय तो स्टेशनबाहेरचा छोटा रस्ता? उत्सुकता मनात दाटूनच येते अगदी. हे फ़िलिंग ओळखीच वाटतय. आता मी काय करणार आहे हेही मला कळतय. मी स्वत:ला थांबवायचा प्रयत्न करतेय. आणि ते किती अशक्य आहे हेही कळतय.
सिग्नल अजूनही पडलेला नाही. मी स्टेशनाच्या एकदा या टोकाला मग त्या टोकाला वळून पहाते.
स्टेशन फ़ारच देखणं दिसतय. अगदी स्वच्छ. स्टेशनबाहेरचा तो अनोळखी रस्ता तर अजूनच आकर्षक. एका उडीत ट्रेनमधून खाली उतरते.
आपण परत चढणार आहोत ट्रेनमधे ह्या पक्क्या खात्रिने.
बिनओळखीचं स्टेशन, त्यापलीकडचं गाव, लांब लांब घरांची छपरं, डोंगरकडा, तिथे रहाणारी माणसं कशी असतील? स्टेशनवर पाउल टेकवताना माझ्या मनात विचार येतात. ट्रेनमधल्या लोकांचा, आपण जिथे जातोय तिथल्या ठिकाणाचा विचारही असतो बहुतेक.
पण मग अचानक मी स्टेशनबाहेरच्या रस्त्याच्या दिशेने जायला निघतेय.
मी मधल्याच कोणत्यातरी स्टेशनवर उतरून गेल्यावर मागे ट्रेन माझ्याकरता थांबलीय की नाही हे मला आठवत नाहीय. मला त्याची पर्वाच वाटत नाहीय.

प्रवास करायचाय आता असं म्हटल की मी प्रवास अर्धवट सोडून जिथे जायचय तिथे न जाता मधल्याच एखाद्या अनोळखी स्टेशनावर उतरुन गेल्याचं स्वप्न मला हमखास पडतं. बरेचदा जागेपणी सुद्धा.

Monday, December 29, 2008

HNY!

जे ठरवलं ते अजिबात झालं नाही/केलं नाही आणि नको त्या गोष्टी करण्यातच इतका वेळ गेलाय २००८ मधे की फ़क्त एक आणि एकच रिझोल्युशन ठरवलय २००९ सालासाठी आणि ते म्हणजे जे ठरवलं ते आणि तेच करायचं आणि लगेच करायचं(हे महत्त्वाचं जास्त 'cz am a big time procastinator).आता हे मी इतक्या सिरियसली ठरवलय पण काय काय ठरवायचय ह्याची लिस्ट इतकी लांबतेय(सगळ्याच अशक्य गोष्टी वाटताहेत त्यातल्या ते वेगळंच आणि)की निदान ते पाळल्याचं समाधान मिळावं म्हणून काहीच ठरवू नये असं सिरियसली वाटतय.

सर्वांना नविन वर्षाच्या आगावू (शब्द काय विचित्र वाटतोय.त्याचा अर्थ इन ऍडवान्स असाच आहे.) शुभेच्छा!! रादर सर्वांना ते नव्या वर्षात जे काही ठरवतील ते पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा!!!

Thursday, December 25, 2008

शब्दांच्या मोहात

मौज दिवाळी अंकामधे अजय कांडरने लिहिलेली कविता वाचली. आवडली.

शब्दांच्या
पलिकडे असतं नातं,
नात्याच्या
पलिकडे असतो विश्वास,
विश्वासाच्या
पलिकडे असते भावना.

-हे पक्कं माहीत असतानाही
नातं, विश्वास
आणि
भावनांच्याही घेत राहिलो आणाभाका;
जिथे आतूनच भरुन येत
जपली जायला हवी होती मैत्री!

आणि
कदाचित शब्दांच्या पलिकडे
अक्षर निर्मितिच्या ध्यासाने झालो असतो वेडेपिसे
तर मैत्रीच्या पलिकडचंही माणूसपण
शाबूत राहिलं असतं आपल्या आत
मैत्रीच्या नात्याचंही गहिरेपण, अधिकच गडद होत जाताना.

परंतु
धुळाक्षरं गिरविणा-या
दिवसापासूनच्या संबंधांच किरणपाणी
अक्षरांच्याच शोधाऐवजी
शब्दांच्याच मोहात झिरपत राहिलं.
आणि
एकमेकांत अंतर कमी झालं
एवढंच नाही, तर आता
एकमेकांच्या संवादालाही उरले नाहीत
आपल्याकडे शब्द.

मित्रांनो,
यात खंत एवढीच आहे :
आता आपण
एकमेकांचेच दुष्मन झालो नाही,
तर एकमेकांच्या अक्षरांचेही!

Wednesday, December 3, 2008

..

संध्याकाळी गेटवेवर गेलो होतो. ऑफ़िसातले बरेचजणं आणि आलेले काही जर्मन क्लायन्ट्स मिळून. तिथे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी. पेटलेल्या मेणबत्त्या,फ़ुले आणि चार्ज्ड झालेली लोकं. मिडियाचा गदारोळ नेहमीप्रमाणेच आणि लोकांच्या घोषणा, गाणी, चिडचिड, संताप. खूपच हायपर मूड. त्यामुळे अशा वातावरणात श्रद्धांजली या प्रकाराला आवश्यक शांतता, गांभीर्य वगैरे कितीही हवीशी वाटली तरी असण्याची शक्यता शून्यच. घडलेल्या घटना पहाता त्यात काही चुकीच नहतं.
या सगळ्या स्फ़ोटक, गजबजाटातही वा-यावर हलत्या मेणबत्त्यांच्या ज्योती पहाताना आणि त्यातच आपलीही एक ज्योत पेटवताना मन आणि डोळे आपोआप भरुन आले.
समुद्र खूप अंधारा आणि काहीच्याकाहीच दिसत होता. इथेच ती बोट लागली या विचाराने परकाही. लांबून पहाताना ताज च्या रेखाकृतीत मलातरी काहीच फ़रक जाणवला नाही आणि किंचितसं बरं वाटलं. खरंतर नजरच घाई घाईने काढून घेतली होती तिथून म्हणूनही निट दिसलं नसेल.
इथल्या ऑफ़िसातला उद्याचा माझा शेवटचा दिवस. फ़ेअरवेल पार्टीसाठी उद्या जाझ बाय द बे. परत समुद्र आणि हाच एरिया. नकोसच वाटतय.
गेले काही दिवस सगळीकडेच क्रिया-प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप, मते मांडणे, ती खोडून काढणे, भावनाशीलतेचा उद्रेक यांचा अतीरेक चालला आहे, सगळेच अतीसंवेदनशील बनल्याने की काय पण किती झटकन रीऍक्ट होताहेत आणि ते सुद्धा टोकाचं. आज गेटवेवर तर या सगळ्याने परिसीमा गाठलेली होती. या सगळ्याला एक फोकस्ड दिशा मिळायला हवीय. भावनांच्या उद्रेकातही समतोल, सारासार बुद्धीने विचार करु शकणारा कोणी शिल्लक राहीलाय कां याची मात्र शंकाच वाटतेय.
वा-यावर फडफडणा-या, काप-या, आत्ता पेटताहेत लगेच विझताहेत अशा इतक्या हजारो ज्योतींमधे एकतरी स्थिरपणे पेटलेली ज्योत असूदेत. दिसूदेत.

Tuesday, December 2, 2008

..

डिप्रेस्ड मन:स्थितीत चरे लपवत सुरु झालेलं रुटीन. ..

काल झेवियर्सच्या आमच्या एमसीएसच्या बॅचच्या गेटटूगेदरचं ठरवत असताना सर्वांना सोयीस्कर पडेल असं कुठे भेटायचंच आजवरचं ऑब्व्हियस उत्तर व्हीटी स्टेशन वर सात वाजता उच्चारताना आणि मंगळवारचं क्रिस्टल रुममधल्या प्रेझेन्टेशन्ससाठीचं वर्षानुवर्षांचं एजन्सीचं स्टॅन्डिंग रिझर्वेशन आता यापुढे ग्रॅन्ड मराठात करण्याच्या फ़रझानाच्या आजच्या मिटिंगमधल्या प्रस्तावाला मान्यता देताना एकमेकांनी एकमेकांच्या चुकवलेल्या सतत टिव्ही पाहून थकलेल्या आणि मग विझलेल्या नजरा.. त्या नजरांतून सतत साठ तास मनावर उमटत गेलेले चरे किती भळभळीतपणे उघडे झाले!
पासपोर्ट ऑफ़िसवरुन अजूनही दिवसातल्या कोणत्याही वेळी जाताना तिकडे लक्ष गेल्यावर असाच एक चरा अजून इतक्या वर्षांनतरही तसाच उघडा पडतो.

कधी कधी चरे मनावर खोल उमटत जात असताना शरीराला जाणवत रहातात. नजरेसमोर स्वत:लाच जखम होताना पहात रहाण्याचा आणि मग ती खोलवर चरत जात असताना नुसतंच पहात रहावे लागत असल्याचा अनुभव सहनशिलतेपलीकडचा असतो. जो फक्त सहनच करावा लागतो. आणि मग ते करत असताना सर्वात आधी जाणवलेला- ही आपल्याच शरीराला आपल्याचसमोर होत असलेली जखम आहे चा धक्का ओसरल्यावर जाणवत रहाणारी ती वेदना,असहायता, चीड, अजून चीड आणि मग सुन्न बधीरपणा आणि फक्त खोलवर डीप्रेशन.

डिप्रेस्ड मन:स्थितीत चरे लपवत सुरु झालेलं रुटीन. .. नशिबानेच यावेळी कोणी त्याला ’स्पिरिट’ म्हणून मिठ चोळत खुलेआम अपमान केला नाहीय.

Friday, October 5, 2007

मौनराग

थॅंक्स स्वाती आणि नंदन.

मौनराग - महेश एलकुंचवार

कलावंताचे काय किंवा इतरांचे काय मौन हे बरेचदा शब्दांपेक्षा जास्त बोलके व अर्थबहुल असते. श्रेष्ठ कलाकृती कधी कधी हळू हळू आपल्याभोवतीचा स्तब्धतेचा परिघ विस्तारताना दिसतात. कधी कधी त्यातच विसर्जित होतानाही अनुभवता येतात. आणि कधी तर कलावंत स्वत्:च मौन होऊन आपले आविष्कारमाध्यम आपल्यातच मिटवून टाकतो. कधी त्याचा त्याग करतो.
आतले काही सापडले किंवा काही सापडत नाही ह्याची खात्री पटली की आविष्काराच्या माध्यमाची गरजच राहत नाही. त्याचे उलट ओझे होते. फ़्रेंच कवी रॅंबो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या विशीतच कविता लिहिणे त्याने समारंभपूर्वक सोडले.
अनुभव व्यक्त करत असताना अनुभवाचे, तंत्राचे व माध्यमाचेही संक्षिप्तीकरण करण्याची निकड! अनुभवाच्या जहराचा थेंब फक्त जिभेवर हवा, इतर फापटपसारा नको असे वाटू लागले की कलावंताला ही निकड वाटते. ह्या संक्षिप्तीकरणाचीच अखेरची पायरी म्हणजे पूर्ण स्तब्धता, आपल्या माध्यमाचा त्याग असे काही रॅंबोच्या बाबतीत घडले का? लिहिणे थांबवल्यावर रॅंबोने स्वत्:ची जी आत्मविनाशी फरपट करुन घेतली ती पाहिली की आतली सघन स्तब्धता त्याला सापडली होतीसे वाटत नाही. Adieu mariage, adieu famille, adieu avenir! ma vie est pass'ee. हाय! संपले माझे आयुष्य, गेले, म्हणणार्‍या रॅंबोला साध्या सरळसूत आयुष्याचीच ओढ होतीसे वाटते. तेही मिळेना, कविता अपुरी पडली, म्हणून स्वत्:जवळचे अतीव मोलाचे असे होते ते तुटके खेळणे फेकावे तसे त्याने फेकून दिले. आत स्तब्धता नाही, फक्त पोकळी आहे, आणि बाहेर तर त्याच अर्थहीन पोकळीचे दृश्यरुप. आतबाहेर तेच आहे, लिहिण्याने काही फरक पडत नाही असे वाटून ह्या कोवळ्या तरुणाने न लिहिण्याचा धाडसी निर्णय घेतला व स्वत्:चे आयुष्य बेदरकारपणे उधळून दिले हेच खरे. आणि व्हॅनगॉफ़. चक्राकार, सळसळत वर जाणार्‍या त्याच्या रेषांनाही त्याची तडफ़ड पेलवेना तेव्हा त्याने आधी वेडात व नंतर कपाळावर टेकलेल्या पिस्तुलाच्या थंडगार नळीत ही स्तब्धता शोधली. त्याने मृत्यू स्वीकारुन स्वत्:ला मौन केले. रॅंबोनेही तेच. त्यांच्या मौनाचा रुपाकार मला एक पाय कापलेला रॅंबो मध्यपूर्वेच्या वाळवंटात कुबडीच्या साहाय्याने वणवणताना असा कधी दिसतो. कधी कपाळावर टेकलेले पिस्तूल असा.
रॅंबोने काय किंवा एमिलीने काय, बुद्ध्या स्वीकारलेली ही जरब बसवणारी स्तब्धता. ती अस्वस्थ करते. पण ती दुसर्‍यांची जीवने. अस्वस्थ करणारी असली तरी ती तटस्थ कलात्मकतेनेच अनुभवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण अशी स्तब्धता आपल्याच माणसाकडून आपल्यावर दरड कोसळावी तशी कोसळते तेव्हा आपण काय करतो?


-------------------------------------------------------------------------------------



हाच पॅरा का? तर मुख्य कारण नंतर. दुसरं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी ब्लॉग लिहीणे बंद करणे-सुरु करणे, पोस्ट्स डीपफ़्रीझ करणे- डीफ़्रॉस्ट करणे वगैरे जी काही नौटंकी माझी स्वत्:शीच चालू होती त्या दिवसांतच हा मौनराग वाचला गेला. मे बी माझ्या त्या दिवसांतल्या मूडशी मिळता जुळता. अभिजितच्या त्यावेळच्या कमेन्टला माझ्याकडून कधीकाळी काही उत्तर दिलं गेलं म्हणजे मला ते सुचू शकलं तर ते असं सुचावं असं तेव्हा वाटलेलं. एलकुंचवारांनी काहीही लिहीलं- म्हणजे नाटक किंवा मौनराग पुस्तका सारखं अतीव सुंदर ललित की ते मला कायमच इन्टेन्स्ली वगैरे भिडत रहातं.मला सर्वार्थाने आकर्षून घेणारा हा सध्याच्या काळातला एकमेव मराठी लेखक.(ह्यात त्यांच लिहीणं तर आहेच पण दिसणं वगैरे एकंदर व्यक्तिमत्वही :D)तेव्हा आवडता पॅरा त्यांचाच असावा ही इच्छा. हे मुख्य कारण..


मी कुणाला टॅग करु?

पराग
संदीप चित्रे
रजनीगंधा
अनु

आणि
ओजस - उठ रे. खूप झोपा काढल्यास